श्री रामचंद्रांची आरती ३
स्वस्वरूपोन्मुबुद्धि वैदेही नेली । देहात्मकाभिमानें दशग्रीवें हरिली । सद्विवेकमारूतिनें तच्छुद्धि आणिली । तव चरणांबुजि येऊनि वार्ता श्रुत कली ।। १ ।।
जय देव जय देव जय निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ।। धृ ।।
उत्कट साधुनि शिळा सेतु बान्धोनि । लिंगदेहलंकापुरी विद्धवंसोनी । कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनि ।। जय ।। २ ।।
प्रथम सीताशोधी हनुमन्त गेला । लंकादहन करूनी सखया मारीला । वधिला जंबूमाळी भुवनी त्राहटीला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। जय ।। ३ ।।
निजबळें निजशक्ती सोडविली सीता । म्हणुनी येणें झाले अयोध्ये रघुनाथा । आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनि आली कौसल्या माता ।। जय ।। ४ ।।
अनुहत वाजिंत्रध्वनि गर्जती अपार । अठरा पद्म वानर करिती भुभुःकार । अयोध्येसी आले दशरथ कुमार । नगरी होत आहे आनंद थोर ।। जय ।। ५ ।।