गंगामाईची आरती
माते दर्शनमात्रै प्राणी उद्धरिसी । हरिसी पातक अवघे जग पावन करिसी ।। दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी । हर हर आतां स्मरतों मति होईल कैसी ।। १ ।।
जय देवी जय देवी जय गंगाबाई । पावन करि मज सत्वर विश्वाचे आई ।। धृ ।।
पडले प्रसंग तैशी कर्मे आचरलों । विषयांचे मोहानें त्यातचि रत झालों ।। त्याचे योगे दुष्कृत सिंधूत बुडालों । त्यांतुनि मजला तारिसि ह्या हेतूनें आलों ।। जय ।। २ ।।
निर्दय यमदुत नेती त्या समयीं राखीं । क्षाळीं यमधर्माच्या खात्यातील बाकी ।। मत्संगति जन अवघे तारियले त्वां की । उरलो पाहें एकचि मी पतितांपैकी ।। जय ।। ३ ।।
अघहरणे जय करुणे विनवितसे भावें । नोपेक्षी मज आतां त्वत्पात्रीं घ्यावें ।। केला पदर पुढे मी मज इतकें द्यावें । जीवे त्या विष्णूच्या परमात्मनि व्हावें ।। जय ।। ४ ।।